नाशिक: कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत 108 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी !

नाशिक। दि. १ जानेवारी २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या बैठकीत कुंभमेळ्याशी निगडित 108 कोटी 27 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच कुंभमेळ्याशी संबंधित विकास कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांनी लवकरात लवकर ना हरकतीचे दाखले देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.

प्राधिकरणाशी संबंधित यंत्रणांच्या बैठकीचे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आज दुपारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत त्र्यंबकेश्वर येथे नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकामास प्रशासकीय मंजुरी देणे, खेरवाडी, सुकेणे, ओढा, देवळाली या रेल्वे स्थानकांवर पाणीपुरवठा विषयक कामांना प्रशासकीय मंजुरी देणे, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेंतर्गत भूसंपादित व अधिग्रहित जागांचे सर्वेक्षण व अनुषंगिक कामांसाठी सर्वेक्षण सल्लागार नेमणुकीसाठी प्रशासकीय मंजुरी देणे, सिंहस्थ कुंभमेळा आराखडा योजनेंतर्गत त्र्यंबकेश्वर येथील विविध दहा आखाड्यांमध्ये टॉयलेट ब्लॉक, अंतर्गत रस्त्यांच्या कामांसह अनुषंगिक कामांना प्रशासकीय मंजुरी देणे, त्र्यंबकेश्वर परिसरातील वीज पुरवठा यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येणार आहे. श्री क्षेत्र सप्तश्रृंग गड येथे नवीन बसस्थानकाचे बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या सर्व कामांमुळे त्र्यंबकेश्वर व वणी परिसरातील पायाभूत सोयीसुविधा बळकट होऊन येणाऱ्या भाविकांना विविध सोयी सुविधा प्राप्त होणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक !

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी आता कमी कालावधी राहिला आहे. प्रत्येक विभागाने मार्च 2027 पूर्वी कामे पूर्ण होतील, असे नियोजन करावे. कामांच्या पूर्ततेसाठी आवश्यक ना हरकत दाखले देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही सांगितले.

कुंभमेळा आयुक्त श्री. सिंह यांनी त्र्यंबकेश्वर येथे सोयीसुविधांसाठी आवश्यक कामांची माहिती दिली. मनपा आयुक्त श्रीमती खत्री यांनी कामांसाठी ना हरकत दाखले देण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची तर जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी प्रशासकीय इमारतीस आवश्यक जागा, भूसंपादन व अधिग्रहित जमीनीबाबतची माहिती बैठकीत दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: णमोकार तीर्थ महोत्सवासाठी प्रस्तावित कामे 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत

या कामांमुळे त्र्यंबकेश्वर शहरात मंदिर परिसरात भव्य कॅरीडाॅर उभारणे, भाविकांना रेल्वे स्टेशनवर यणा-या भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे, त्र्यंबकेश्वर येथे साधुग्राम, वाहनतळ, निवाराशेड यांचे नियोजनबद्ध कामास मदत होणे, शहरातील आखाड्यांना मागणीनुसार कामे होण्यास, कुंभमेळा कालावधीत अखंड, सुरक्षित, व विश्वासार्ह वीजपुरवठा होण्यास, सप्तश्रृंग गड येथे भाविकांची सुखकर प्रवासाची सोय करून सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यास मदत होणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोयता घेऊन दहशत माजवणारा तरुण गुन्हे शाखेच्या ताब्यात !

यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर, लेखा व कोषागारे विभागाचे सह संचालक बी. डी. पाटील, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. थुल, श्री. लटपटे, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे, रेल्वेचे मनीषकुमार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक किरण भोसले यांच्यासह वरीष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790