
नाशिक | २२ मे २०२५: नाशिकजवळील मुंढेगाव शिवारातील जिंदाल पॉलीफिल्म्स कंपनीत मंगळवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीचे तांडव अद्यापही सुरूच आहे. या आगीत आतापर्यंत दोन कामगार जखमी झाल्याचे समजते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या या औद्योगिक क्षेत्रात लागलेल्या आगीला २४ तास उलटूनही आग नियंत्रणात अद्याप नियंत्रणात आलेली नाही. आतापर्यंत २२ अग्निशमन बंबांनी शंभरहून अधिक फेऱ्या केल्या असून, बुधवारी उशिरापर्यंत शेकडो जवान आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात व्यस्त होते.
कंपनीच्या चौथ्या क्रमांकाच्या गेटच्या मागे असलेल्या शेडमध्ये कच्चा माल साठवण्यात आलेला होता. याच भागातून आग सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासणीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक पथकाकडून तपास सुरू असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
बुधवारी सकाळी आग काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचे दिसून आले होते. मात्र, दुपारी ती पुन्हा भडकली आणि कंपनीच्या सर्व प्रकल्पांपर्यंत पोहोचली. नाशिकसह ठाणे, भिवंडी आणि अहिल्यानगर येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
या आगीचे धुराचे लोट इतके प्रचंड होते की, महामार्गावरील प्रवाशांमध्येही खळबळ उडाली. अनेकांनी घटनास्थळी गर्दी करून पाहणी केली. तथापि, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. कंपनीतील मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना तत्काळ स्थलांतरित करून सुरक्षित अंतरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.