नाशिक (प्रतिनिधी): आज (दि. 2 मे 2020) रोजी नाशिक शहरांमधील सहा रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका नाशिक तर्फे विविध पथके तयार करून तातडीने सर्व ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले. नव्याने 4 प्रतिबंधित क्षेत्र समता नगर, उत्तम नगर, पाथर्डी फाटा व एम.एच.बी. कॉलनी सातपूर येथे तयार करण्यात आलेले आहेत. याबाबत प्रतिबंधक क्षेत्राचा आदेश नाशिक महानगरपालिका आयुक्त यांनी निर्गमित केलेले आहेत.
याबाबत पोलिसांना अवगत करून योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पथका मार्फत दैनंदिन सर्वेक्षण करून संशयित रुग्ण शोधण्यात येतील.
आज कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झालेल्या नागरिकांची संपूर्ण चौकशी करता एक व्यक्ती नाशिक शहरा बाहेरून नियम न पाळता दुधाच्या टँकर मधुन भडगाव येथुन आलेले आहेत व दुसरी व्यक्ती सात लोकांच्या समुहात मालेगाव जवळील एका गावातुन आलेले आहेत. इतर दोन रुग्णांच्या बाबतीत सुद्धा याच प्रकारची पद्धत दिसून येत आहे. यावरून पुन्हा स्पष्ट होते की नाशिकमध्ये आढळून येणारे कोरोना बाधित रुग्ण हे कोरोना बाधित प्रदेशातून आलेले आहेत व नाशिक शहरामध्ये सामाजिक संपर्कातून कोणीही कोरोना बाधित झालेले नाही, त्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
कोराना बाधित भागातून नाशिक शहरांमध्ये येणाऱ्या नागरिकांना किंवा त्यांच्यामुळे इतरांना कोरोना विषाणूचा संसर्ग होतो, या गोष्टीची दखल घेऊन नाशिक महानगरपालिका पालिकेतर्फे पोलीस यंत्रणेला कळविण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने गैरमार्गाने अथवा विनाकारण कोरोना बाधित प्रदेशातून येणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.