News

नाशिक: अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेत तब्बल १.३५ लाख रुपये किमतीचा तुपाचा साठा जप्त

नाशिक| दि. 19 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): सणासुदीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, खवा, मावा इत्यादी खाद्यपदार्थांना मागणी असते. ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न’ सुरक्षिततेचा या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने मिठाई व तत्सम पदार्थ तपासणी मोहिम जिल्ह्यात सुरू केली आहे. या तपासणी मोहिमेत एकूण रूपये 1 लाख 35 हजार 790 किंमतीचा संशयित तुपाचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहती अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (अन्न) दि.ज्ञा.तांबोळी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

अन्न व औषध प्रशासनाला 11 सप्टेंबर 2025 रोजी मे. रामदेव ट्रेडिंग कंपनी, आशा नगर कॉलनी, भगवती निवास, व्यापारी बँकेजवळ, नाशिकरोड, नाशिक यांच्या पेढीत कमी दर्जाचे तूप विक्रीसाठी असल्याच्या संशयावरून या पेढीची तपासणी केली असता या पेढीत विक्रीसाठी असलेल्या संशयित तुपाचा साठा आढळून आला. संशयित तुपाचा 1 नमुना घेवून उर्वरित रूपये 31 हजार 390 किंमतीचे 43 लिटर साठा जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: श्री सप्तशृंगी गड यात्रा उत्सवासाठी दर दहा मिनिटाला बस; ३२० अतिरिक्त बसेस धावणार !

अन्न व औषध प्रशासनाला 17 सप्टेंबर 2025 रोजी मे. श्री.स्वामिनाथ ट्रेडर्स, जयभवानी रोड, नाशिक यांच्या पेढीत कमी दर्जाचे तूप विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार या पेढीची तपासणी केली असता पेढी विनापरवाना तूप या अन्नपदार्थाची विक्री करीत असल्याचे आढळून आले. या पेढीत विक्रीसाठी असलेल्या संशयित तुपाचे 2 नमुने घेवून उर्वरित रूपये 1 लाख 4 हजार 400 किंमतीचे 145 लिटर साठा जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: १५० किलो बनावट खवा, पनीर जप्त करून नष्ट; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई !

जप्त केलेल्या अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून या अन्न पदार्थांचा अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.

सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न) मनिष सानप, सह आयुक्त (अन्न) दिनेश तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाची पथके शहरातील पनीर व खवा उत्पादक यांच्यावर लक्ष ठेवणार असून अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. २०) वीजपुरवठा बंद राहणार !

सण उत्सव काळात नागरिकांनी मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करतांना दक्षता घ्यावी. तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थांसंदर्भात तक्रार तसेच गोपनीय माहिती असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here