नाशिक (प्रतिनिधी): रेशन धान्य वाटप करतांना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या दि.१९ एप्रिल २०२० पर्यंत नाशिक महसूल विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ३ दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ७ तर त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात ४ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच अहमदनगर व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ७ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर जोखमीची जबाबदारी आहे. या काळात नागरिकांना अन्न धान्य वाटपाची जबाबदारी स्वस्तधान्य दुकानदारांवर असून रेशन धान्य वाटप करतांना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या दि.१९ एप्रिल २०२० पर्यंत राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच यापुढेही स्वस्तधान्य दुकानांमध्ये काळाबाजार, वाटप करतांना कमी धान्य देणे किवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.