नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या दुसऱ्याचा लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. परंतु येणारी संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांना धोकादायक असल्याचे वर्तविले जात असल्याने त्यांच्यासाठी जिल्ह्यात बाल कोविड केअर रुग्णालय व हाय डिपेंडन्स रुग्णालय अशा द्विस्तरीय कोविड रुग्णालयांचे नियोजन करण्यात येत आहे.
लहान मुले कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बाधित होणार नाही याची काळजी पालकांनी देखील घ्यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा व शहर कोरोना सद्यस्थिती उपाययोजना व कोरोना पश्चात आजारांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निलेश श्रींगी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. निखिल सैदाणे, डॉ. आवेश पल्लोड, डॉ. उत्कर्ष दुधडीया आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच ऑक्सिजनची कायमस्वरूपी व्यवस्था होण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागात नवीन 62 ऑक्सिजन प्रकल्प तयार करण्यात येत आहेत. या परिस्थितीत कमी होणारी रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांना लागणारा ऑक्सिजनचा वापर काही प्रमाणात कमी झाला असल्याने उद्योगांना देखील आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुवरठा होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.
ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले लेव्हल तीनचे सर्व निर्बंध सध्या जसेच्या तसे लागू राहतील. परंतु शनिवार व रविवार या दोन दिवशी 50 व्यक्तिंच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजेपर्यंत लग्न सोहळ्यांना परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. बैठकीच्या वेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आपल्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.