नाशिक, दि. 21 मे, 2025: जिल्ह्यातील पीडित महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ‘महिला आयोग तुमच्या द्वारी’ जनसुनावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार ३० मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. पीडित महिलांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात घेवून उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या जनसुनावणी कार्यक्रमात जिल्ह्यातील महिलांच्या समस्यांवर प्रत्यक्ष संवाद साधण्यात येणार आहे. कोणतीही पीडित महिला पूर्व सूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहू शकणार आहे. या सुनावणीस संबंधित विभागांचे अधिकारी, पोलिस प्रशासन तसेच महिला व बालकल्याण विभाग उपस्थित राहणार असून, तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येणार आहे. या उपक्रमातून महिलांच्या समस्या थेट महिला आयोगापर्यंत पोहोचवून त्यांचे न्यायालयीन व प्रशासनिक पातळीवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक- पुणे हायवे, नाशिक येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा दूरध्वनी क्रमांक 02562-2236368 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकातन नमूद करण्यात आले आहे.