नाशिक। दि. १९ जुलै २०२५: श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे यात्रा भरणार आहे. यात्रेत दोन ते तीन लाख भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शन व प्रदक्षिणेसाठी येतात. या कालावधीत सुरक्षेसाठी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे भाविकांनी पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
पोलिस अधीक्षक पाटील यांनी म्हटले आहे, की श्रावण सोमवारनिमित्त २५ जुलै ते २३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत भाविक येतात. भाविकांनी आपल्या सोबत कमीत कमी साहित्य आणावे. यात्रेकरूनी मौल्यवान चीज वस्तू आणू नयेत, मंदिरात भाविकांना बॅग, पिशव्या आदी नेण्यास सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून मनाई करण्यात आली आहे. कुठलीही बेवारस अगर संशयित वस्तू आढळून आल्यास तिला स्पर्श न करता तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे.
कोणीही संशयास्पद व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्यास ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणावी. वाहने अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच लावावीत. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोणी जाणून- बुजून अफवा पसरवत असल्यास तसे पोलिसांना तत्काळ कळवावे. या सूचनांचे पालन करीत भाविक, नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन पोलिस अधीक्षक पाटील यांनी केले आहे.