नाशिकच्या सर्व शाळांमध्ये सोमवारी होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

नाशिक। दि. १३ जून २०२५: नाशिक जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून (दिनांक १६) सुरू होत असून शाळेच्या पहिल्या दिवशी मध्ये विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात येणार आहे. राज्यात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय विविध शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातही सर्व लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी सर्व शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. याशिवाय, शिक्षण विभागाने गुणवत्ता आणि पटसंख्या वाढीकडे अधिक लक्ष देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ओघ वाढेल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 13 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

यावेळी बोलताना मंत्री भुसे म्हणाले की, सध्या राज्यातील अनेक शाळांमध्ये नवीन उपक्रम राबविले जात आहेत. हे उपक्रम त्या शाळेपुरते मर्यादित न राहता ते सर्व शाळेपर्यंत पोहोचावे, यासाठी नियोजन केले जाईल. विद्यार्थ्यांचा ओढा जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत वाढावा यासाठी अधिक चांगले आणि गुणवत्तापूर्ण वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत. येत्या सोमवारपासून सर्व शाळा सुरू होत आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी या विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. त्याचे नियोजन जिल्हा परिषदेने तयार केले आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा या शाळांकडे आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम साह्यभूत ठरतील, असेही मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

यावेळी मंत्री दादा भुसे यांनी पीएम श्री शाळा, विविध शासकीय योजनेव्दारे शाळांच्या पायाभूत भौतिक सुविधांचा विकास. (पिण्याचे स्वच्छ पाणी, कम्पाऊंड वॉल, स्वच्छतागृह, वर्ग खोली बांधकाम व दुरुस्ती इ.), प्रधानमंत्री पोषण शक्ती कार्यक्रम, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, इ. ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा, आधार पडताळणी / अपार आयडी, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, हेल्थ कार्ड, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम आढावा, पवित्र पोर्टल – शिक्षक भरती टप्पा-२, शिक्षक समायोजन, जिल्हा परिषद – स्मार्ट स्कूल मोहीम, जिल्हा परिषद क्षेत्रात पटसंख्या वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, शिक्षक / संस्था / अधिकारी यांनी विद्यार्थी हितासाठी राबविलेले नवउपक्रम, आयडॉल शिक्षक बँक, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शाळा आणि सुपर – ५० कार्यक्रम आदी योजना आणि उपक्रमांचा आढावा घेतला.

⚡ हे ही वाचा:  महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी, सुपर ५० तसेच विविध शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नव्या उपक्रमांची आणि त्याच्या अंमलबजावणीची माहिती दिली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नितीन बच्छाव यांनी सादरीकरणाद्वारे विविध बाबींची माहिती दिली. यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदी या बैठकीला उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790