नाशिक, दि. 9 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी मिठाई विक्रेते व नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नाशिक सह आयुक्त (अन्न) दि.ज्ञा. तांबोळी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
अन्न व्यावसायिकांनी घ्यावयाची दक्षता:
👉 कच्चे अन्नपदार्थ व खवा हे परवानाधारक/ नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावेत व त्याबाबतची खरेदी बिले ठेवावीत. प्रत्येक अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या विक्री बिलावर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत प्राप्त परवाना/ नोंदणी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
👉 अन्न पदार्थ तयार करतांना पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.
👉 अन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावेत.
👉 कामगारांची त्वचा व संसंर्गजन्य रोगापासून मुक्तबाबतची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी.
👉 मिठाई तयार करतांना केवळ फुडग्रे खाद्यरंगाचा 100 पी.पी.एमच्या आतच वापर करावा.
👉 बंगाली मिठाई ही 8 ते 10 तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मेटेरिलयवर निर्देशित करण्यात यावे.
👉 स्पेशल बर्फीचा वापर मिठाई तयार करण्यासाठी करू नये.
👉 माशांचा प्रार्दूभाव होवू नये यासाठी जाळीदार झाकणे व बंदिस्त शोकेसचा वापर करावा.
👉 फरसाण तयार करतांना वापरण्यात येणारे खाद्यतेल हे 2 ते 3 वेळाच वापरण्यात यावे त्यांनतर ते RUCO अंतर्गत बायोडिझेल कंपन्यांना देण्यात यावे.
नागरिकांनी घ्यावयाची दक्षता
👉 मिठाई, दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करतांना केवळ नोंदणी/ परवानाधारक आस्थापनांकडून खरेदी करावी. उघड्यावरील तसे फेरीवाल्यांकडून मिठाई, खवा (मावा) खरेदी करू नये.
👉 मिठाई, दुध/ दुग्धजन्य अन्नपदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावे. खरेदी करतांना Use by date पाहुनच खरेदी करावेत.
👉 माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो 24 तासांच्या आत करावे तसेच त्यांची साठवणूक योग्य तापमानात (फ्रिजमध्ये) करावी.
👉 बंगाली मिठाई 8 ते 10 तासांच्या आत सेवन करावी.
👉 मिठाईवर बुरशी आढळल्यास त्याचे सेवन करू नये. तसेच मिठाई खराब अथवा चवीत फरक जाणवल्यास ती नष्ठ करावी.
नागरिकांना सुरक्षित व निर्भेळ अन्न उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन दक्षता घेत असून ही मोहिम दिवाळीपर्यंत सुरू असणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रशासनाचा टोल फ्रि क्रमांक 1800222365 यावर अथवा fdanashik2022@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. अन्न पदार्थांच्या तक्रारी असल्यास FoScos या प्रणालीवर ऑनलाईन तक्रार करावी, असे आवाहनही सह आयुक्त श्री तांबोळी यांनी केले आहे.
![]()

