नाशिक (प्रतिनिधी): राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात 1 मार्च ते 31 मार्च 2025 या कालावधीत 0 ते 18 वर्षे वयोगटातील अंदाजित 1 लाख 65 हजार बालकांची तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी नजीकच्या ठिकाणी नियोजनातील शाळा किंवा अंगणवाडी येथे बालकांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा रूग्णालय, नाशिक व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
0 ते 18 वर्षापर्यंतच्या बालकांची/ किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे. आजारी आढळलेल्या बालकांवर उपचार करणे गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देवून उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा-सुविधा पुरविणे, सुशिक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे ही या मोहिमेची उद्दीष्टे आहेत. या तपासणी मोहिमेतून जन्मत: व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार असलेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांवर नजीकच्या शासकीय शाळा व अंगणवाडीच्या ठिकाणी निदान व उपचार करण्यात येतात.
जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील अंदाजित 1 लाख 65 हजार बालकांची तपासणी 76 पथकांमार्फत पूर्ण करण्यात येणार असून 6 मार्च 2025 पर्यंत 234 शाळा, 361 अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली आहे. यात 0 ते 6 वर्षे वयोगटातील 23 हजार 448 बालकांची, 6 ते 18 वर्षे वयोगटातील 35 हजार 392 बालकांची तपासणी पूर्ण झाली असून त्यापैकी 4 हजार 479 बालके आजारी आढळली आहेत. तालुकास्तरावरून 31 मार्च 2025 पर्यंतचे दिनांक निहाय सूक्ष्मकृती नियोजन जिल्हास्तरावर करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.