नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील आदिवासी उमेदवारांना लिपिक ग्रामसेवक, तलाठी, शिपाई अशा वर्ग 3 व वर्ग 4 तसेच इतर पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी आदिवासी उमेदवारांना कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, कळवण येथे साडेतीन महिने कालावधीचे पूर्व प्रशिक्षण 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे.
यासाठी आदिवासी उमेदवारांनी 27 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, जुने तहसील कार्यालय आवार, नेहरू चौक, कळवण, जि. नाशिक येथे मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कळवण चे मार्गदर्शन अधिकारी रविकुमार पंतम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रशिक्षणासाठी अनुसूचित जाती (ST) प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे. उमेदवार किमान एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण असावा. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारास दरमहा रूपये 1 हजार विद्यावेतन देय राहील. मुलाखतीस येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र जसे जात प्रमाणपत्र व स्वत:च्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडल्याची खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रतीसह एक पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावा.
मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. तसेच मुलाखतीस येण्याचा व जाण्याचा खर्च दिला जाणार नाही. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी अर्ज करू नयेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02592-299973 किंवा मोबाइल 8888717338 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.