
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा
नाशिक। दि. ६ जानेवारी २०२६: मालसाने, ता. चांदवड येथे 6 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या णमोकार तीर्थ महोत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडील कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
णमोकार तीर्थ महोत्सव मालसाने, ता. चांदवड येथे साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, णमोकार तीर्थाच्या माध्यमातून नवीन धार्मिक पर्यटन क्षेत्र विकसित होणार आहे. या ठिकाणी वर्षभर भाविकांची वर्दळ राहणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या धर्तीवर या महोत्सवाचे नियोजन करण्यात यावे. भाविकांना णमोकार तीर्थ क्षेत्राबरोबरच मांगी तुंगी येथे भेट देणे सुलभ व्हावे म्हणून सुरत, मुंबई येथून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध करून देता येईल का, याबाबत पडताळणी करावी.
गर्दी व्यवस्थापन, वाहनतळाचे नियोजन करावे. वाहनतळामध्ये वीज, शौचालय, पाणी याची व्यवस्था करावी. तसेच स्वयंसेवक नियुक्त करून सराव करून घ्यावा. आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले की, णमोकार तीर्थ महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करावे. त्यासाठी प्रशासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती शर्मा, कार्यकारी अभियंता श्री. ठाकूर यांनी बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या कामाची, तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू पाटील यांनी आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी याठिकाणी इतर विभागांमार्फत सुरू असलेल्या तयारीचाही आढावा घेतला.
यावेळी बैठकीस आमदार डॉ. राहुल आहेर, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, कार्यकारी अभियंता (विद्युत) श्री. बि-हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत, एमटीडीसीचे व्यवस्थापन जगदीश चव्हाण, चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, महोत्सवाचे अध्यक्ष सुमेरसिंग काले, ट्रस्ट चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
![]()


