विशेष सहाय्य विभागाच्या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ

नाशिक (प्रतिनिधी): राज्याचे विशेष सहाय्य विभागाच्या वतीने ‘जनकल्याण यात्रा 2025’ चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. या यात्रेचा शुभारंभ आज २ मार्च रोजी विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दिंडोरी येथे करण्यात आला.
या जनकल्याण यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमास दिंडोरीचे नायब तहसीलदार बकरे, निर्माता दिग्दर्शक शंकर बारवे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री झिरवाळ म्हणाले, जनकल्याण यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम मोबाईल एलईडी व्हॅनमार्फत राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे. ही यात्रा पुढील पंधरा दिवस राज्यभर सुरू असणार आहे. विशेष सहाय्य विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य शासन व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत.
या योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. या योजनाच्या लाभासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे. तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी अथवा संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विशेष सहाय्य मंत्री झिरवाळ यांनी केले आहे.
या यात्रे दरम्यान दाखविण्यात येणाऱ्या माहितीपटाची निर्मिती व दिग्दर्शन बारवे यांनी केले आहे. हा चित्रपट मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे राज्यातील विविध गावात दाखविण्यात येऊन जनजागृती करण्यात येईल व लाभार्थींपर्यंत योजनेची माहिती पोहचविण्यात येणार आहे.
“राज्य शासन आणि केंद्र सरकार समाजातील गोरगरीब, वंचित, ज्येष्ठ, वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन सर्वांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना राबवत आहे. या विविध योजना राबवताना संबंधित लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, त्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी डी.बी.टी. पोर्टलद्वारे त्यांना त्यांची विशेष सहाय्य मदत त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. समाजातील गरजू, निराधार, निराश्रीत आणि वृद्धांच्या कल्याणासाठी राज्य शासन नेहमीच कटीबद्ध आहे आणि यापुढेही राहील. समाजातील सर्व गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना या विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळावी, यासाठी विशेष सहाय्य विभाग कार्यरत असून या योजनेचा प्रसार राज्यभर करण्यात येत आहे. तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी मंत्री झिरवाळ यांनी केले.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790