नाशिक (प्रतिनिधी): दिव्यांग व्यक्तींसाठी 5 टक्के दिव्यांग सेस निधीतून शंभर दिवसांच्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक व नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025 सकाळी 10 वाजता रोजी पंचायत समिती, बांधकाम भवन समोर, त्र्यंबकरोड, नाशिक या ठिकाणी दिव्यांगासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त दिव्यांग बेरोजगार व्यक्तींनी उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिक, सहाय्यक आयुक्त, अनिसा तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या/ नियोक्ते उपस्थित राहून प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध महामंडळे स्वयंरोजगाराच्या योजनांची माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. दिव्यांग लाभार्थ्याचे वय 18 ते 45 वर्षांदरम्यान असावे. दिव्यांग लाभार्थी ग्रामीण भागातील असावा. लाभार्थ्याकडे किमान 40 टक्के दिव्यांगत्वाचे युडीआयडी (स्वावलंबन कार्ड) असावे. दिव्यांग व्यक्ती मेळावा 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींसाठी असून दिव्यांग व्यक्तीस वाचता व लिहिता येणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक हा आधार कार्डशी सलग्न असावा. दिव्यांग नोकरी ईच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे.
भरती इच्छुक नियोक्त्यांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या ऑप्शन वर क्लिक करुन, पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा यावर रिक्तपदे अधिसूचित करावी व 7 फेब्रुवारी 2027 रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे. नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्रीमती तडवी यांनी केले आहे.