जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; गारपिटीमुळे शेतीला फटका

नाशिक। दि. ३१ मार्च २०२६: जिल्ह्यात सोमवारी (दि. ३०) दुपारनंतर हवामानात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाने गारपीट आणि वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. या परिस्थितीमुळे विविध शेतीपिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, विशेषतः उन्हाळी कांद्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. मालेगाव तालुक्यातील वनपट येथे भिंत कोसळून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेचे दागिने लांबवले

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण अस्थिर होते. सोमवारी दिवसभर आभाळ दाटून आले होते. सायंकाळी बागलाण, मालेगाव, देवळा, सिन्नर, नांदगाव, चांदवड, निफाड आणि येवला या भागांत अचानक पावसाने जोर धरला. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

बागलाण तालुक्यातील चौगाव आणि मुंजवाड परिसरात द्राक्ष, डाळिंब बागांसह कांदा पिकाला फटका बसला आहे. सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी कांदा शेतातच वाळत घातला होता. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे हा कांदा ओला झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘उल्लास नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात फ्लॅन्ट परीक्षेचे आज (दि. २९) आयोजन

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे, ठाणगाव तसेच देवळा तालुक्यातील लोहोणेर, भऊर आणि पिळकोस भागातही गारपीट झाली. यामुळे शेतीचे नुकसान वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, मालेगाव तालुक्यातील वनपट येथे सोमवारी वीज पडून गोठ्याची भिंत कोसळली. या अपघातात यश प्रवीण शिंदे (वय १४) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790