नाशिक: नदीजोड प्रकल्पच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक। दि. २५ एप्रिल २०२६: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भव्य शुभारंभ झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अहिल्यादेवींचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, इंदूर संस्थानचे श्रीमंत युवराज महाराज यशवंतराव होळकर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, वेदात नदीचे महात्म्य वर्णन केले असून नदीला आई मानले आहे. नदी स्तुतीसुक्तात ऋषींमुनींनी नदीच्या उपयुक्ततेचे वर्णन केले आहे. वारशाचे संवर्धन आणि विकास याचा समन्वय देशाच्या उज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच अहिल्यादेवींच्या विचाराच्या आधारे भविष्यातील विकासाची दिशा दाखविण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशासाठी महत्वाची असल्याने ती बारमाही प्रवाहित राहावी यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले..

🔎 हे वाचलं का?:  आमदार राहुल ढिकलेंच्या पत्नीचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ढिकले कुटूबियांचे सांत्वन

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलव्यवस्थापनातील योगदानाचे स्मरण केले. ते म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी घाट, बारव यांची निर्मिती करतांना अध्यात्मिकता आणि उपयुक्तता याचा समन्वय साधला. पाण्याचे महत्व लक्षात घेऊन जलव्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी निर्माण केलेले बारव आजही सुस्थितीत असून त्याचे संवर्धन राज्य शासन करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अहिल्यादेवी होळकर यांनी नद्यांचे महत्व जाणले आणि नदी प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न केले. महिला, गरीब आदिवासीना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे विचार आजही महत्वाचे आणि मार्गदर्शक असून छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांच्या आधारेच शाश्वत विकास साधता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, त्र्यंबकेश्वर आणि चौँडी येथून दोन यात्रा सुरू होत असून मध्य प्रदेशातील माहेश्वर येथे नर्मदातीरी समारोप होणार आहे. राज्यातील ३० नदीखोऱ्यांतील पाणी कलशांच्या माध्यमातून नर्मदेला अर्पण करण्यात येईल. गोदावरी आणि नर्मदेचे महात्म्य लक्षात घेऊन आणि विचार, वारसा आणि विकास ही त्रिसुत्री घेऊन यात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलेले जलसंवर्धनाचे कार्य जनतेत रुजविण्याचा प्रयत्न या यात्रेद्वारे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी या यात्रेत सहकार्य करावे असे आवाहनही श्री. विखे पाटील यांनी केले.

🔎 हे वाचलं का?:  दहावी, बारावी परीक्षेचे १७ नंबरचे अर्ज भरण्यास प्रारंभ; २१ मे पर्यंत अंतिम मुदत

आण्णासाहेब मोरे म्हणाले, जलसाक्षरतेचे विचार सेवेकऱ्यांमार्फत पोहोचविण्यात येत आहेत. गुरुपिठाच्या माध्यमातून नदी स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशाच्या विकासासाठी थोरामोठांचे विचार भारतभर पोहोचविण्याचे काम करावे लागतील. संस्कृती, संस्कार केले तर देश बलशाली आणि विकसित होईल. नवीन पिढीने निर्व्यसनी राहून देशाचे संस्कारदूत बनावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने कुंभमेळ्याच्या कामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करून कुंभमेळ्यात गर्दीचे नियोजनाबाबत त्यांनी सूचना केल्या.

युवराज होळकर म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी जलव्यवस्थापनाची सुरुवात नर्मदा येथे केली. जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे. गोदावरी आणि नर्मदेला जोडून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा संदेश दिला जाणार आहे. गोदावरी महाराष्ट्राची तर नर्मदा मध्यप्रदेशची जीवनधारा आहे.
जन्मभूमी ते कर्मभूमी जलयात्रेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. अहिल्यादेवींनी सुरू केलेली फड पद्धती उपयुक्त असून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते कुशावर्तातील जलकलश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला आणि राज्यातील ३० नदीखोऱ्यांतील पाणी कलशांच्या माध्यमातून आणून त्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. केदार कंठशिखर वयाच्या सहाव्या वर्षी सर करणाऱ्या चिमुकल्या मनकर्णिका देशपांडे हिचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ या गीताचे विमोचन आणि उन्नत नाशिक अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी श्री. विखे पाटील यांनी सपत्नीक १०८ कन्यकांचे पूजन केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बसस्थानकातून महिलांचे दागिने लंपास

कार्यक्रमाला माजी मंत्री रवींद्र चव्हाण, सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, राहुल आहेर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, हिरामण खोसकर, दिलीप बनकर, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, मंत्री विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, ह.भ.प.संजय नाना धोंगडे, महंत उद्धव महाराज मंडलिक, मंदाकिनी मोरे, महामंडलेश्वर रामचंद्रदास मोरे, उपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थित होते.

‘जल व्यवस्थापन कृती पंधरवड्या’ अंतर्गत आयोजित या जलयात्रेचा मुख्य उद्देश राज्यातील जलस्त्रोतांबाबत जनजागृती करणे, लोकसहभाग वाढवणे आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे हा आहे. ही जलयात्रा २५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. ​यात्रेत सुमारे ५०० जलयात्री, वारकरी आणि तरुण सहभागी झाले आहेत.

जलयात्रेचा प्रवास असा राहील:
२५ एप्रिल: त्र्यंबकेश्वर ते संगमनेर (मुक्काम: संगमनेर).
२६ एप्रिल: संगमनेरमार्गे शिर्डी (मुक्काम: शिर्डी).
२७ एप्रिल: कोपरगाव, वैजापूर, संभाजीनगर, घृष्णेश्वर (मुक्काम: घृष्णेश्वर).
२८ एप्रिल: कन्नड, चाळीसगाव, धुळे (मुक्काम: धुळे).
२९ एप्रिल: धुळे ते महेश्वर, मध्य प्रदेश (समारोप).

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790