नाशिक: कन्यादान योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नाशिक, दि. २२ मे २०२५: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कन्यादान योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण देविदास नांदगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

विवाह सोहळ्यामध्ये अनाठायी खर्च करणे, त्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होणे हे प्रकार टाळण्यासाठी वरील प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना रूपये 25 हजार आणि सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे रूपये 4 हजार अनुदान कन्यादान योजनेंतर्गत देण्यात येते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक परिक्रमा मार्गाच्या भू संपादन प्रक्रियेत योगदान द्यावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

कन्यादान योजनेच्या लाभासाठी वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. नव दाम्पत्यातील वधू, वर यापैकी दोन्ही किंवा एकजण हे अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक असून वराचे वय 21 वर्षे व वधूचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असू नये. वधू व वर यांच्या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय आहे. तसेच सदर योजनेचा लाभ विधवा महिलेस दुसऱ्या विवाहासाठी अनुज्ञेय आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग दाम्पत्य अथवा त्यांचे कुटूंब यांच्याकडून झालेला नसावा. याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेले असावे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी असे आहेत निकष:
सामूहिक विवाह आयोजित करणारी सेवाभावी संस्था ही धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी. तसेच अर्ज सादर करतांना सदर नोंदणी प्रभावी असणे आवश्यक आहे. सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने विवाहात सहभागी होणाऱ्या वधू व वर यांची कागदपत्रे विवाह संपन्न होण्यापूर्वी 30 दिवस आगोदर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शिक्षकांकडून मागितली दोन लाखांची लाच; उपशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पूलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790