प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांची माहिती
नाशिक। दि. २० नोव्हेंबर २०२५: अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक यांच्याकडील वायुवेग पथक व रस्ता सुरक्षा पथकाकडून १ एप्रिल २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ३२ हजार ६०१ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० हजार ८६७ वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून ५८ लाख २९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षासंदर्भात विविध नावीण्यपूर्ण उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात. यामध्ये वाहतुकीचे नियम, वाहतूक चिन्हांचा समावेश असलेल्या हस्त पत्रिका, माहितीपर पुस्तिका, रस्ता अपघात झाल्यावर करावयाची कार्यवाही, प्रथमोपचार, वाहनांना परावर्तिका (रिफ्लेक्टर) लावणे, जनजागृती करणे, विद्यार्थी, वाहन चालकांना वाहन चालविण्याबाबत मार्गदर्शन करणे, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वाहन चालकांची नेत्र, आरोग्य तपासणी करणे, दुचाकी चालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात येते.
याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी महावॉकेथॉनचे आयोजन करणे, महामार्गावरून जाणारी वाहने, बाजार समितीत येणाऱ्या बैलगाड्यांना, कार्यालयात येणाऱ्या परावर्तिका लावणे, अवजड अनुज्ञप्तीधारकांमध्ये रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करणे, २५ वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण, तरुणींना रस्ता सुरक्षा व वाहन चालविण्याचे ज्ञान अवगत होण्यासाठी नाशिक फर्स्ट संस्थेच्या सहकार्याने प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येतात.
१८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांसाठी चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, नाशिक येथे सिम्युलेटरवर प्रशिक्षण व समुपदेशन करण्यात येते. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करणाऱ्या या वयोगटातील तरुण अर्जदांरासाठी सिम्युलेटरवर प्रशिक्षण व रस्ता सुरक्षा याविषयावर समुपदेशनपर अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. याबाबत ९९ हजार ६९६ विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांच्या ठिकाणी रोज दुपारी १२ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दोषी वाहन चालकांवर रस्ता सुरक्षा पथक व वायुवेग पथकाच्या माध्यमातून मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येते. तसेच दुचाकी चालविताना हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न लावणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, विमा मुदत संपुष्टात येणे, सिग्नल तोडणे, प्रवाश्यांची अवैध वाहतूक, जादा भारमान वाहतूक, परावर्तिका, टेल लॅम्प न लावता वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वायुवेग पथक, इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून वेळोवळी कारवाई करण्यात येते, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी म्हटले आहे.
![]()
