
नाशिक। दि. २० जानेवारी २०२६: जिल्हा रुग्णालय क्रिकेट समितीच्या वतीने जिल्हा रूग्णालय व अधिनस्त आरोग्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी 16 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत वार्षिक क्रिकेट स्पर्धा हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) क्रिकेट मैदान येथे पार पडल्या.
यात अंतिम सामना ग्रामीण रूग्णालय बाऱ्हे आणि जिल्हा रूग्णालय नाशिक डॉक्टर्स संघ यांच्यात झाला. अंतिम सामन्यात जिल्हा रूग्णालय डॉक्टर्स संघ क्रिकेट करंडकाचा मानकरी ठरला. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांच्या हस्ते विजेत्या संघाला व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गौरविण्यात आले, अशी माहिती समिती अध्यक्ष अमोल दौडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
दैनंदिन रुग्णसेवेत व्यस्त असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तणावमुक्त वातावरण मिळावे, संघभावना व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश द्यावा, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच इतर आरोग्य संस्थांतील एकूण २४ संघांनी सहभाग नोंदविला. ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे आणि जिल्हा रुग्णालय डॉक्टर्स संघ यांच्यात अंतिम सामना झाला.
या सामन्यात जिल्हा रुग्णालय डॉक्टर्स संघाने विजय मिळवत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकावला. ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे संघ उपविजेता ठरला, तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात जिल्हा रुग्णालय ‘अ’ संघाने विजेतेपद मिळविले.
या क्रिकेट स्पर्धेस स्वस्तिक हॉस्पिटल व खुशी किया मोटर्स यांचे प्रायोजकत्व लाभले होते. या स्पर्धेमुळे आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनंत पवार, डॉ. नितेश पाटील, डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. अनिरूद्ध भांडारकर, डॉ. सतीश शिंपी, डॉ. अनंत गायकवाड यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले, असेही श्री. दौडे यांनी कळविले आहे.
![]()


