त्र्यंबकेश्वरमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी; ७५० दिंड्यांचे आगमन अपेक्षित

नाशिक। दि. ८ जानेवारी २०२६: संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरपरिषद प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (दि. ७) नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची संयुक्त बैठक पार पडली.

यात्रेकरांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी राज्य शासनाकडून त्र्यंबक नगरपरिषदेला १ कोटी २५ लाख रुपयांचे यात्राकर अनुदान मंजूर करण्यात आले असून, त्या निधीतून विविध विकास व सुविधा कामे हाती घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

यंदाचा यात्रोत्सव १३ ते १५ जानेवारी दरम्यान होणार आहे. मुख्य दिवस असलेल्या षट्तिला एकादशीला राज्याच्या विविध भागांतून सुमारे ७५० दिंड्या आणि अंदाजे ३ ते ४ लाख भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

यात्राकाळात स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. शहरात १,५९५ तात्पुरती शौचालये आणि २०० स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येणार असून, आरोग्य विभागामार्फत अतिरिक्त मनुष्यबळ नेमून नियमित स्वच्छता व जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

तसेच दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी व शहरातील प्रमुख मार्गांवर १२५ हून अधिक अतिरिक्त एलईडी पथदिवे बसवले जाणार आहेत. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर्स उपलब्ध करून देण्यात येणार असून, कुशावर्त कुंडाची स्वच्छता व देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, गटारींवर संरक्षक ढापे बसवणे तसेच गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेटिंगचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790