नाशिक: आठ वर्षीय बालिकेचे अपहरण व खुनाप्रकरणी दोघांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): अजंग (ता. मालेगाव) येथील भाविका या अल्पवयीन मुलीच्या अपहरण, खून प्रकरणाचा छडा लावण्यात मालेगाव पोलिसांना यश आले आहे. दोघा शेजाऱ्यांमधील सततचे वाद, पूर्ववैमनस्य व लहान मुलांच्या भांडणातील वादाच्या पर्यावसनातून हा खूनाचा प्रकार घडला. विशेष तपास पथकाने या प्रकरणी सखोल चौकशी करून दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.

या संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. ही माहिती अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांनी मंगळवारी (ता.२१) सायंकाळी येथे पत्रकार परिषदेत दिली. अजंग येथील प्रशांतनगरमधील अल्पवयीन मुलीचे १४ मेस मध्यरात्री अपहरण झाले. १५ मेस मोसम नदी काठावरील विहिरीत या मुलीचा मृतदेह मिळून आला. धुळे येथील शासकीय महाविद्यालयात शवचिकित्सा करण्यात आल्यानंतर अवजड वस्तू डोक्यात मारुन तिचा खून करण्यात आल्याचा अहवाल प्राप्त झाला. सुरवातीला वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 30 ऑक्टोबरला आयोजन

मुलीच्या वडिलांच्या पुरवणी जबाबावरून या प्रकरणी अपहरण करून तिचा खून व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आठ वर्षीय मुलीचा खून झाल्याने अजंग-वडेलसह परिसरातील ग्रामस्थांच्या भावना तीव्र होत्या. सलग दोन दिवस नामपूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावर रास्तारोको आंदोलनाचा अयशस्वी प्रयत्न झाला. संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिकाही कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतली होती. पोलिसांनी सात दिवसात या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन थांबले होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

गुन्हा व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनीही घटनास्थळी भेट देत या गुन्ह्याच्या तपासासाठी श्री. भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबिरसिंह संधू, सूरज गुंजाळ, उपनिरीक्षक नितीन गणापूरे, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, योगिता नारखेडे, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार गोरक्षनाथ संवत्सकर, पोलिस नाईक सुभाष चोपडा, योगिता काकड, देविदास गोविंद, दत्तात्रेय माळी आदींच्या पथकाने या प्रकरणी बारकाईने तपास सुरु केला.

मुलीच्या वडिलांनी व्यक्त केलेला संशय, तपासातील मिळालेल्या पुराव्यांचे तांत्रिक विश्‍लेषण करून या प्रकरणी योगेश शिवदास पटाईत (३५) व नीलेश उर्फ भैय्या रवी पवार (२६, दोन्ही रा. अजंग) यांना अटक करण्यात आली. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. श्रीमती गडकरी तपास करीत आहेत.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

कुटुंबीयांतील वादाने घेतला बळी:
भाविकाची आजी व योगेश पटाईत हे अजंगमध्ये शेजारी राहतात. दोघा कुटुंबीयांमध्ये गेल्या दीड वर्षापासून वाद सुरु होता. दोघा कुटुंबातील लहान-मोठे एकत्र खेळताना सतत वाद होत होते. पूर्ववैमनस्य व लहान मुलांच्या भांडणाचे पर्यावसन हे चिमुकलीच्या खुनात झाले. योगेशने तिची आजी घरी नसताना मुलीचे अपहरण करून डोक्यात अवजड वस्तू मारून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह विहिरीत फेकून दिला. या खुनाचा छडा लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790