नाशिक (प्रतिनिधी): बेपत्ता असलेल्या आई आणि मुलीचा मृतदेह घराजवळच्या विहिरीत सोमवारी (ता. २७) सकाळी आठच्या सुमारास आढळून आला. अवघ्या नऊ महिन्याच्या मुलीसह २३ वर्षीय विवाहिता सोनांबे (ता. सिन्नर) जवळच्या साबरवाडी येथून बेपत्ता झाली होती. पल्लवी संदीप बिन्नर ही मुलगी ज्ञानेश्वरी हिला घेऊन घरातून कोणाला काही न सांगता निघून गेली होती.
सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने शनिवारी तिच्या पतीने सिन्नर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पल्लवी व नऊ महिन्यांची ज्ञानेश्वरी बेपत्ता झाल्यापासून पिंपळेजवळच्या तामकडवाडी (ता. सिन्नर) येथील तिचे नातेवाईक त्या दोघींचा सर्वत्र शोध घेत होते. बिन्नर कुटुंबीय राहत असलेल्या घरापासून सातशे मीटर अंतरावर असलेले विहिरीत सकाळी पल्लवीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.
माहेरी समजल्यावर नातेवाइकांनी धाव घेतली. विहिरीत असलेला पल्लवीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना अडीच ते तीन तास प्रतीक्षा करावी लागली. पल्लवीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर ज्ञानेश्वरीचा शोध घेण्यात आला. सुमारे अर्ध्या तासानंतर विहिरीच्या तळाशी कपारीत ज्ञानेश्वरीचा मृतदेह हाती लागला. दोन्ही मृतदेह सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
सिन्नरचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, हवालदार निवृत्ती गिते यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पल्लवीचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. ही महिला घरातून का निघून गेली? ही आत्महत्या आहे की घातपात? यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.