नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दारु पिऊन शिवीगाळ करुन पैशांची सतत मागणी करणाऱ्या मुलाची वडीलांनीच १८ हजार रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवुन आणल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असुन, या प्रकरणी वणी पोलिसांनी मयताच्या वडीलांसह तीन संशयीतांना ताब्यात घेतले असुन संशयीतांमध्ये एका विधीसंघर्षीत बालकाचा देखील समावेश आहे.
वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ता. २२ नोव्हेंबर रोजी वणी पोलिस ठाणे हद्दीतील लोखंडेवाडी शिवारात, पालखेड धरणाच्या भराव परिसरात एक मृतदेह पडलेल्या असल्याची माहीती मिळाली होती.
दरम्याण प्राथमिक तपासात सदर मृतदेह किशोर उर्फ टिल्लु दगु उशीर (वय २६ वर्षे) रा. खडकजांब, ता. चांदवड याचा असल्याचे निष्पन्न झाले होते.
सदर मृतदेहाच्या कपाळावर, डोक्यावर, चेहऱ्यावर, तोंडावर, डोळ्यांवर अज्ञात हत्याराने गंभीर वार करुन त्यास ठार केल्याप्रकरणी मयताचे दाजी सुरेश सुधाकर कांडेकर रा. खडकजांब, ता. चांदवड यांनी वणी पोलिसांत फिर्याद दिली होती.
याप्रकरणी निर्जनस्थळी खुन झाल्यामुळे कुठलाही साक्षीदार नसतांना तपास करणे पोलिसांसमोर आवाहन होते. परंतु गोपणीय व तांत्रीक दृष्ट्या तपास करत पोलिसांनी संशयीत संदीप छगन गायकवाड (वय ३०) व त्याचा साथीदार एक १६ वर्षीय विधीसंघर्षीत मुलास ताब्यात घेतले.
याप्रकरणी खुनाचा हेतू तपासणे कामी संदीप यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने दिलेल्या कबुली नुसार मयताचे वडील दगु जयराम उशीर (वय ५७) रा. खडकजांब ता. चांदवड यांना त्यांचा मयत मुलगा किशोर उर्फ (टिल्लु) हा दारु पिऊन सतत पैशाची मागणी करुन शिवीगाळ व दमदाटी करायचा म्हणुन त्या त्रासाला कंटाळुन त्याला जीवे मारण्याची रुपये १८ हजारांची सुपारी संशयीत आरोपी संदीप व त्याचा सहकारी असलेल्या विधीसंघर्षीत मुलास दिली होती.
यावरुनच दोन्ही संशयीतांनी किशोर उर्फ टिल्लुची हत्या केल्याचे कबुल केले. या माहिती वरुन पोलिसांनी मयताचे वडील दगु जयराम उशीर यांना आज ता. २७ रोजी ताब्यात घेतले असुन अधिक तपास चालु आहे.
तर संदीप यास ता. २८ पर्यंत पोलिस कोठडी असुन, विधीसंघर्षीत बालकास बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे.
सदर तपासात पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक अदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे सपोनि गणेश शिंदे व कर्मचारी तसेच वणी पोलिस ठाण्याचे सपोनि निलेश बोडखे व सहकारी यांनी परिश्रम घेतले.