नाशिक: भूषण लहामगे हत्या प्रकरणाची पोलिसांकडून उकल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वी नाशिक-मुंबई महामार्गावर आठवा मैलाजवळील पायलट हॉटेलसमोर भरदुपारी पहिलवान भूषण लहामगे याचा धारदार हत्याराने व गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी भूषणचा चुलतभाऊ वैभव लहामगे यास अटक करत वाडीव-हे पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडीव-हे पोलीस ठाण्यात कलम ३०२, १०९, ५०६, ३४ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

वाडीव-हे पोलिसांनी सर्व बाजूंनी कसोशीने तपास करून भूषण लहामगेचा चुलतभाऊ वैभव यशवंत लहामगे यास अटक करून त्याच्याकडून या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार त्र्यंबकेश्वर येथील पार्किंग मधून तर वालदेवी धरणालगत पुरून ठेवलेला गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा हस्तगत केला. या गुन्ह्यात वैभव याचे इतर दोन साथीदार देखील सहभागी असल्याची कबुली वैभव याने दिली असून ते अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

वैभव लहामगे ठाणे येथील वागळे इस्टेटमधील चेकमेट दरोडा प्रकरणातील आरोपी असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे. वैभव आणि भूषण याचा वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून वाद होता. त्या कारणावरून त्याने भूषण लहामगे याचा खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दहा किलो सोने घरफोडी प्रकरणात देखील वैभव लहामगे याचे नाव नाशिक शहर पोलिसांच्या तपासात समोर आले असल्याचे समजते.

या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीव-हेच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, उपनिरीक्षक सुनील बिराडे, राजू पाटील, पोलीस नाईक प्रविण काकड, विक्रम काकड, शरद धात्रक, अदीप पवार, धोंगडे, मांडवडे, येशी, गिते, तुपलोंढे, बोराडे आर्दीच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790