12 फेब्रुवारीला एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 296 इतक्या रुग्णांची वाढ झाली आहे… आणि हे चिंताजनक आहे..
नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून सतर्क रहावे. तसेच शासकीय व खाजगी लॅबमधील स्वॅब तपासणी अहवालातील तुलनात्मक विश्लेषण करून कोरोना परिस्थितीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हातील कोरोना उपाययोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. सुरुवातीलाच पालकमंत्र्यांना माहिती देत असताना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्ह्यातील कोविड टेस्टिंगचे प्रमाण वाढविले असल्याने बऱ्याच दिवसांनंतर पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी जिल्ह्याचा मृत्युदर कमी असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे असे सांगितले.
त्याचप्रमाणे शासकीय व खाजगी लॅबमधील स्वॅब तपासणीच्या अहवालात सतत तफावत आढळून येत असून यावर पडताळणी करणे गरजेचे झाले आहे असेही सांगितले. त्यातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी एकाच वेळी घेण्यात आलेले स्वॅब शासकीय व खाजगी लॅबकडे तपासणीसाठी पाठविणे, खाजगी लॅबमध्ये 28 टक्के अधिक पॉझिटीव्ह अहवाल येत असल्याने त्यातील ठराविक स्वॅबची शासकीय लॅबमध्ये पुन्हा तपासणी करणे आणि दैनंदिन घेण्यात येणारे स्वॅब जिल्हा रुग्णालयाच्या नियंत्रणाखाली मध्यवर्ती ठिकाणी एकत्र करून त्यानंतर विविध लॅब्समध्ये तपासणीसाठी पाठविण्यात यावे, असे तीन पर्याय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीत सांगितले. यावर त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही, इतर शहरांमधील वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे बंधन येऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा नियमित वापर करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे खाजगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या स्वॅब तपासणीतील पॉझिटीव्हीटीचे प्रमाण 28 टक्के तर शासकीय लॅबमधील पॉझिटीव्हीटीचे प्रमाण 5 टक्के येत असल्याने याबाबत प्रशासनामार्फत पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे रूग्णांमधील हर्डइम्युनिटी तपासण्यासाठी शहरात करण्यात येणाऱ्या ‘सिरो सर्व्हे’चे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लस घेतली असून त्याचा कोणताही विपरीत परिणाम झाला नसल्याचे दिसून आल्याने देण्यात येणारी कोविशिल्ड ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे कोरोना काळात फ्रंटलाईनवर राहून काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी पुढाकार घेऊन लसीकरणाची मोहीम यशस्वी करावी. असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी केले आहे.