नाशिक (प्रतिनिधी): पैशांच्या देवाणघेवाणावरून म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मखमलाबादकडे जाणाऱ्या नाल्यालगत एका गरोदर महिलेवर चॉपरने सपासप वार करून ठार मारल्याची घटना २०२१ साली घडली होती. जिल्हा व सत्र न्यायालयाने याप्रकरणी आरोपी आदेश ऊर्फ आदी ऊर्फ सागर दिलीप भास्कर (२९, रा. मोरे मळा, पंचवटी) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश मलकापट्टी रेड्डी यांनी आजन्म कारावास व दहा हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली.
१९ जानेवारी २०२१ साली म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अश्वमेघनगकडून पवार मळ्याकडून मखमलाबादच्या घाडगे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आदेश भास्कर याने पूजा विनोद आखाडे (२३,रा. मोरे मळा, काकडबाग) यांना अडवले. तत्पूर्वी आदेश याने पूजा आखाडे यांच्याकडून पैसे उसनवार घेतले होते. ह्या उसनवार पैशावरून दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी महिला गरोदर आहे हे माहित असतांनाही आदेशाने चॉपरसारख्या धारदार शस्त्राने गळ्यावर, चेहऱ्यावर गंभीररित्या वार केले होते तसेच पोटात चॉपर भोसकून खून केला होता.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी अहिरे, अंमलदार विशाल गायकवाड, जितेंद्र शिंदे यांनी याचा तपास करत आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करत दोषारोपपत्र दाखल केले होते. या खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. अंतिम सुनावणीत सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी युक्तिवाद करत बाजू मांडली.
यावेळी त्याने गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारावरील रक्ताचे डाग आरोपी क्रमांक २: विलास प्रकाश खरात (२७, रा. म्हसरुळ) याने धुवून पुरावा नष्ट करण्यास आदेश यास मदत केली होती. त्यामुळे न्यायालयाने विलासला तीन वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजारांचा दंड ठोठावला.