नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२० साली आरोपी अण्णा उर्फ सोनू रमेश माळी (१८, रा. पाथर्डी शिवार) याने एका अल्पवयीन मुलावर बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने माळी यास बुधवारी (दि.८) दोषी धरले.
त्यास न्यायाधीश पी.व्ही. घुले यांनी २० वर्षांची सक्तमजुरी व ६० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून २५ हजार रूपये नुकसानभरपाई म्हणून पीडितास द्यावयाचे असल्याचे निकालात न्यायालयाने म्हटले आहे.
अल्पवयीन मुलाला नैसर्गिक विधीसाठी सोबत घेऊन जात माळी याने त्याच्याशी अनैसर्गिकरीत्या शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्याच्याविरुद्ध पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३७७ सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियमांतर्गत (पोस्को) इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. भामरे यांनी करत आरोपीविरुद्ध सबळ परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात अंतिम सुनावणी बुधवारी जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक- ५मध्ये पार पडली.
साठ हजारांचा दंड:
फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांअधारे न्यायलयाने माळी यास दोषी धरले. यावेळी सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता दीपशिखा भिडे आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने माळी यास २० वर्षांची सक्तमजुरी व एकूण ६० हजारांचा दंड ठोठावला.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790