नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी परिसरात २०१६ साली तिघांनी कुरापत काढत एकाला लाकडी दांड्याने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या अंतिम सुनावणीत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी तिघा आरोपींना दोषी धरले. त्यांना पाच वर्षांचा साधा कारावास व प्रत्येकी दहा हजारांचा दंड अशी शिक्षा गुरुवारी (दि.६) ठोठावली.
जखमीला २५ हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश:
६ मार्च २०१६ साली धर्मेंद्र महादु तांबे (३४, रा. सैलानी बाबा थांबा, जेलरोड) यांना कुरापत काढून आरोपी दीपक गोरख पाटील (३३), लक्ष्मण रमेश पानकर (२६, दोघे रा. वाल्मिक नगर) व बंटी ऊर्फ महेंद्र विनायकर पानकर (३३, रा. टकले नगर) यांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन हवालदार बी. व्ही. वाघ यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाकडून सहायक सरकारी अभियोक्ता सुनीता चिताळकर यांनी युक्तिवाद करत सहा साक्षीदार तपासले. डॉ. निशांत गवाळे, डॉ. प्रवेश पाचोरी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. फिर्यादी, साक्षीदार, पंच यांची साक्ष व पुराव्यांअधारे तिघांनाही दोषी धरले. दंडाच्या रकमेव्यतिरिक्त आरोपींनी एकूण २५ हजार रूपयांची नुकसानभरपाई तांबे यांना देण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले, अशी माहिती चिताळकर यांनी दिली आहे.
![]()


