नाशिक। दि. ४ फेब्रुवारी २०२६: जुने नाशिक परिसरात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून दमदाटी व धक्काबुक्की केल्याच्या नऊ वर्षांपूर्वीच्या घटनेप्रकरणी न्यायालयाने चौघा आरोपींना दोषी ठरवले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी आरोपींना प्रत्येकी सहा महिन्यांचा साधा कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी (दि. ३) सुनावली.
भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिवंधा चौकात ३० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता तत्कालीन सहायक पोलिस उपनिरीक्षक त्र्यंबकगिरी गोसावी व त्यांचे पथक वाहतूक व्यवस्थापनासाठी तैनात होते. यावेळी दिलीप बुधाजी वाघ, ललित चंद्रकांत वाघ, वसंत बुधाजी वाघ आणि दिलीप बापू राठोड (सर्व रा. तिवंधा चौक) यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करत पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. जोनवाल यांनी तपास करून आवश्यक पुरावे संकलित करत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी युक्तिवाद केला. फिर्यादी, साक्षीदार व पंचांच्या साक्षी तसेच तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने चौघांनाही दोषी ठरवले.
![]()

