नाशिक: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क राहून तत्काळ प्रतिसाद द्यावा- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक। दि. ८ जुलै २०२६: जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद द्यावा. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.

नाशिक शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी डाॅ आडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे आदी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिमकार्ड बंद पडले, नवीन सिम घेतले; तोपर्यंत खात्यातून ५१ लाख गायब

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, नियंत्रण कक्षामार्फत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक घटनेवर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. पूर, भूस्खलन किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय राखून नागरिकांना त्वरीत मदत उपलब्ध करून द्यावी. यावेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या वाहनाचीही पाहणी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लग्नासाठी अघोरी पूजा ! अर्ध्या रात्री स्मशानात नेले, महिलेची ७७ हजारांची फसवणूक

श्री. राजपूत यांनी जिल्ह्यातील नगरपालिका, तहसील कार्यालये तसेच विविध यंत्रणांकडून प्राप्त होत असलेल्या घटनांची माहिती, आपत्कालीन उपाययोजना आणि नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येत असलेल्या समन्वयाची सविस्तर माहिती दिली.

तत्पूर्वी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी होळकर पुलावरून गोदावरी नदीच्या पूरस्थितीची पाहणी करून नदीकाठच्या परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पिंपळगाव बहुला येथील भूस्खलनग्रस्त रस्त्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद, पोलीस अधीक्षक डाॅ डी. एस. स्वामी, तहसीलदार पंकज पवार यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
०००००
जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेता सर्व यंत्रणांनी २४ तास सज्ज राहून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवावे. नागरिकांनीही प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेत प्रशासनाला सहकार्य करावे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रानभाज्यांच्या संवर्धनासोबत बाजारपेठ विकासावर भर देण्याची गरज- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790