नाशिक (प्रतिनिधी): सोशल मिडियावर महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष देत पैसे टाकण्यास सांगत चांगला नफा देण्याचे सांगून व्यावसायिकाला ७५ लाख ९५ हजारांना गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार २४ ऑक्टोबर २०२४ रोजी घरी असताना अनन्या शुक्ला नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर बोलणे सुरू झाले. महिलेने मी भारत लॉजिस्टिकमध्ये एक्स्पोर्ट करण्याचे काम करत असल्याचे सांगितले. क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करणार का असे विचारले. महिलेने बीटॉप इंडिया कंपनीत इंडियन करन्सीमधून यूएस डॉलरमध्ये पैसे टाकून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगत लिंक पाठवली. युजर आयडी पासवर्ड टाकून पॅनकार्ड अपलोड केले.
सिंगल ग्रुपमध्ये अॅड झाले. एका अनोळखी नंबरवरील व्यक्तीसोबत गुंतवणुकीसंदर्भात बोलणे झाले. संशयित व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे बीटॉप कंपनीत भारतीय मूल्यानुसार अमेरिकन डॉलरमध्ये पैसे टाकत क्रिप्टोमध्ये विविध रक्कम गुंतवणूक केली. गुंतवणुकीवर नफा झाल्याचे गुंतवणूक खात्यावर दिसले. फिर्यादीने दोन वेळा पैसे काढण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली. काही तरी कारण सांगून रिक्वेस्ट कॅन्सल केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. (सायबर पोलीस स्टेशन , गुन्हा रजिस्टर क्रमांक : २५/२०२५ )
अनोळखी लिंकला प्रतिसाद देऊ नका:
सोशल मीडियावर अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट, लिंक आल्यास प्रतिसाद देऊ नका. सायबर गुन्हेगारांकडून अशा फसव्या लिंक पाठवल्या जातात. नागरिकांनी सतर्कता बाळगत फसवणूक टाळावी. – संदीप मिटके, सहायक आयुक्त, गुन्हे शाखा