नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील एका ज्येष्ठ नागरिकास १८ लाख रूपयाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अप्पर सर्किटमधील शेअर गुंतवणुकीत मोठा फायदा मिळून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे.
एक महिना उलटूनही रक्कम हाती न पडल्याने या ज्येष्ठ नागरिकाने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात सेवानिवृ्त्त ज्येष्ठ नागरिकाने फेसबुकच्या माध्यमातून गुंतवणुकीचा पर्याय शोधत असतांना भामट्यांनी त्यांच्याशी विविध मोबाईल क्रमांक आणि व्हॉटसअप कॉलद्वारे संपर्क साधला होता.
शेअर मार्केटमधील ब्रोकरांनाच गुंतवणुक करता येणा-या अप्पर सर्किटमध्ये गुंतवणुक केल्यास मोठा फायदा होईल असे आमिष दाखवून भामट्यांनी वृध्दाचा विश्वास संपादन केला.
सर्वसाधारण नागरीकांना थेट अप्पर सर्किटमध्ये गुंतवणुक करता येत नसल्याने सेवानिवृत्ताने तयारी दर्शविल्याने ही फसवणुक झाली. १९ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान सेवानिवृत्ताने तब्बल १७ लाख ७५ हजाराची गुंतवणुक केली. महिना उलटूनही जास्तीच्या मोबदला पदरी न पडल्याने सेवानिवृत्ताने भामट्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे सेवानिवृत्ताने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.