नाशिक (प्रतिनिधी): सातपूर परिसरातील कामगार नगरमधील युवकाचा टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून निघृण खून केल्याची घटना शनिवारी (दि. ८) रात्री अकरा वाजेच्या सुमारास भोसला स्कूलमागील संत कबीर नगरमधील रस्त्यावर घडली. अरुण बंडी असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अरुण परिसरात रात्री आला असता जुने वाद असलेल्या सातपुरच्या टोळक्याने त्याला घेरत त्याच्यावर हल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. माहिती मिळताच गंगापूर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांच्या दोन दुचाकींची तोडफोड करण्यात आली होती. घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाचे जवान दाखल झाले होते. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तिघा हल्लेखोर संशयितांना ताब्यात घेतले.
दोघे जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपुत, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. दरम्यान, मृतदेह घटनास्थळावरून शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्याचा बंदोबस्त शासकीय रुग्णालयात तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.