Amazon

नाशिक: पगारे खून प्रकरणातील फरार राहुल सोनवणे तीन महिन्यांनंतर पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक। दि. १५ नोव्हेंबर २०२६: अंमली पदार्थांच्या व्यवसायातील स्पर्धा आणि वर्चस्वाच्या वादातून झालेल्या सुमित पगारे खून प्रकरणातील गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या राहुल सोनवणे याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अंबड गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने म्हसरूळ येथील गणेश अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर छापा टाकून शनिवारी (दि. १५) पहाटे ही कारवाई केली.

शाहूपथ परिसरातील जुन्या बिटको रुग्णालयाजवळ १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमित अरुण पगारे याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. अंमली पदार्थांच्या व्यवसायातील स्पर्धा आणि वर्चस्वाच्या संघर्षातून हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून त्याच्या पोटात दोन गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात सुमित पगारे याचा मृत्यू झाला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवृत्तीवेतनधारकांसाठी स्मार्टफोनवरून हयातीचा दाखला सादर करण्याची डिजिटल सुविधा

या प्रकरणात आतापर्यंत १३ संशयितांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन संशयिताविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, गुन्ह्यातील सहा संशयित गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच राहुल संदीप सोनवणे (वय ३५, रा. समृद्धी पार्क, चव्हाण मळा, जय भवानी रोड) हा म्हसरूळ परिसरातील एका फ्लॅटमध्ये लपून बसल्याचीगोपनीय माहिती अंबड युनिट तीन पथकाचे चारुदत्त निकम, भूषण सोनवणे यांना मिळाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आधाराश्रमातील बालकाला मिळाले परदेशी दाम्पत्याचे मायेचे छत्र !

या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्यासह चारुदत्त निकम, भूषण सोनवणे, योगेश चव्हाण आणि हर्षल जाधव यांच्या पथकाने शुक्रवारी रात्रीपासून म्हसरूळ-दिंडोरी रोडवरील गणेश अपार्टमेंट परिसरात पाळत ठेवली. शनिवारी पहाटे सापळा रचून पोलिसांनी राहुल सोनवणे याला संबंधित फ्लॅटमधून ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात २४ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

२० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी:
या खून प्रकरणात यापूर्वीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मोक्का न्यायालयाचे कामकाज शनिवारी येवला येथे सुरू असल्याने राहुल सोनवणे याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० नोव्हेंबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राहुल सोनवणे याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री, खंडणी आणि अंमली पदार्थांची तस्करी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790