नाशिक (प्रतिनिधी): खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गुरुवार (दि. २४) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी ही शिक्षा सुनावली. अतुल सिंग (२१, रा. शिवनेरी चौक, सातपूर) असे शिक्षा लागलेल्या आरोपीचे नाव आहे.
अभियोग कक्षाने दिलेली माहिती अशी, गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ जून २०२२ रोजी रात्री ९.५० वाजता कॅनॉलरोड येथे हा प्रकार घडला होता. मयत पवन पगारे (२२, रा. श्रीकृष्णनगर, सातपूर) हा आरोपी अतुल सिंग याची दुचाकी तालवत असताना त्याच्यामागे बसलेला आरोपी अतुलने ‘पवन हा भयट्या आहेस, तू बॉयलर आहे, तू मला घाबरत जा’ असे बोलून तुझ्या आई-वडिलांना मारून टाकील अशी धमकी दिल्याच्या कारणातून चाकुने वार करत खून केला होता.
आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार पंच आणि तपासी अधिकारी यांना सादर केलेल्या पुराव्यास अनुसरून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील सुधीर कडवे यांनी कामकाज पाहिले.