नाशिक । दि. १६ जानेवारी २०२६: नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १५) एकूण ५६.६७ टक्के मतदान नोंदवले गेले असून, हा टक्का मागील निवडणुकीच्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांनी कमी आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ६१.६० टक्के मतदान झाले होते.
महानगरपालिकेच्या ११२ जागांसाठी रिंगणात असलेल्या ७३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. शुक्रवारी (दि. १६) मतमोजणी होणार असून, सायंकाळपर्यंत सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मतदानाच्या दिवशी शहरातील विविध भागांत मतदारांचा उत्साह दिसून आला. मात्र, मतदार यादीत नावे न सापडणे, काही मतदान केंद्रांमध्ये बदल झाल्याने मतदारांना दूरवर जावे लागणे, तसेच काही ठिकाणी प्रभाग पुनर्रचना झाल्याने गोंधळ निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर आल्या.
सिडको परिसरात भाजपचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या निवासस्थानाबाहेर कथित पैसे वाटपाच्या चर्चेमुळे मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १५ मधील काठे गल्ली येथील जुन्नरे शाळेत बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप करत भाजप आमदार देवयानी फरांदे आणि उद्धवसेनेचे माजी आमदार वसंत गिते यांच्यात आमनेसामने येण्याची घटना घडली. यामुळे त्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आज नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
![]()


