नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कामधील व्यक्तींकडून तपासणी करण्यासाठी होत असलेली टाळाटाळ लक्षात घेत पालिकेच्या वैद्यकीय विभागाने आता बाधित रुग्णाच्या थेट घरी जाऊन तो खरोखर होम आयसोलेशनमध्ये रहात आहे का, त्यावर व्यवस्थित वैद्यकीय उपचार होत आहे का, तसेच संपर्कातील व्यक्ती नेमकी कोण जाणून त्यांचे जागेवर नमुने घेण्यासाठी पालिकेने खास पथक तयार केले आहे.
शहरातील सहाही विभागांमध्ये कोरोनाबाधित व्यक्तींच्या घरी जाऊन तपासणी करतील. नाशिक शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असून शहरात आता प्रतिदिन रुग्ण आढळण्याची संख्या एक हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.
राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये नाशिक अग्रक्रमी आल्यामुळे आयुक्त कैलास जाधव ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विभागाने आता थेट रुग्णापर्यंत पोहोचून त्याच्या संपर्कामध्ये व्यक्ती कोण याचा शोध घेणे सुरू केले आहे.
वास्तविक गेल्या वर्षी जेव्हा कोरोना रुग्ण सर्वप्रथम नाशिकमध्ये आढळला, त्यावेळी याेग्य पद्धतीने काम होत होते. मात्र ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे तसेच कोरोनाबाबत पुरेशी जनजागृती झाल्यामुळे या मोहिमेत काहीसे शैथिल्य आले होते. मात्र, गेल्या दहा दिवसांत दिवसाला सरासरी साडेचारशे रुग्ण आढळत असल्यामुळे पुन्हा एकदा ‘चेस द कोरोना’ मोहीम सुरू झाली आहे.
साधारण पाच व्यक्तींचे पथक असणार असून त्यात एक सिस्टर, एक लॅब टेक्निशियन, एक मदतनीस, साधारण दोन शिक्षक असे पथक असेल. रुग्णाच्या संपर्कामध्ये कोण व्यक्ती आल्या होत्या, त्यांनी कोरोना चाचणी केली की नाही तसेच चाचणी केली नसल्यास जागेवर त्यांचे घशातून नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले जातील असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.