नाशिक (प्रतिनिधी): राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालके व मुलांसाठी जिल्हा रूग्णालय नाशिक येथे सोमवार 31 जुलै, 2023 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत नेत्ररोग तपासणी, कर्णबधीर/ कानाचे आजार तपासणी व क्लिप पॅलेट शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.
सदर शिबीर जिल्हा रूग्णालय, नाशिक येथे ओपडी क्रमांक 14, डिईआयसी विभाग येथे आयोजित केले आहे. शिबीरात 0 ते 18 वयोगटातील मुलांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यात आढळणाऱ्या आजारास पायबंद घालणे हा हेतू आहे. शिबीरास बालकांना उपस्थित करणेसंदर्भात तालुकास्तरावर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत कार्यरत पथकांना आदेशित करण्यात आले आहे.
या शिबीरात सुयोग हॉस्पिटल, नाशिक व इंदोरवाला ईएनटी हॉस्पिटल, महात्मा गांधी मेडीकल कॉलेज,नवी मुंबई यांच्यावतीने डोळे, कानाची तपासणी व क्लिप पॅलेट तपासणीसाठी उपचारतज्ञ उपस्थित राहणार आहेत. तसेच दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी डॉ.तुषार गोडबोले, बालग्रंथीरोगतज्ञ आणि दर महिन्याच्या दुसऱ्या गुरूवारी व चौथ्या मंगळवारी डॉ. ललित लवणकर, बालह्रदयरोगतज्ञ यांच्या मार्फत तपासणी करण्यात येते.
या शिबीराचा 0 ते 18 वयोगटातील नेत्ररोग, कर्णरोग व क्लिप पॅलेट असणाऱ्या बालक, मुले यांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. संदिप सुर्यवंशी यांनी केले आहे.