नाशिक (प्रतिनिधी): राज्यासह नाशिक शहरात किमान अन् कमाल तापमानात वाढ होत आहे. किमान तापमानात १ ते ४ अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा वाढ झाल्याने रात्रीच्या उकाड्यामध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात कमाल ३७.० तर किमान १८.३ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. पुढील पाच दिवस वातावरण कोरडे राहणार असल्याने किमान अन कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे.
राज्यात मार्च महिन्यात कोकणात उष्ण व दमट वातावरण राहिले, तर मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले होते. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव या ठिकाणी उन्हाची तीव्रता कायम राहिली. अंशतः ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली होती. आता पुन्हा वातावरण कोरडे झाल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे रात्रीच्या उकाड्यात देखील वाढ झाली आहे. नाशिकमध्ये सायंकाळपासून ते सकाळपर्यंत उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत होते.