नाशिक (प्रतिनिधी): भाजीपाला व्यापाऱ्याकडे व्यवसाय करायचा असेल तर ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या भालेराव टोळीच्या चार सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. पंचवटी पोलिसांनी येवला येथे ही कारवाई केली. विशाल चंद्रकांत भालेराव, गौरव ऊर्फ चुहा सोनवणे, शुभम मधुकर खरात, सिद्धार्थ संजय बागुल असे संशयिताची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्री व्यवसाय करणारा संदीप पगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित विशाल भालेराव, गौरव सोनवणे आणि त्यांचे दोन साथीदारांनी घरी येऊन लाकडी दांड्याने मारहाण करत व्यवसाय करायचा असेल तर दर महिन्याला ५० हजार खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी देत चॉपरचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली,अशी तक्रार पोलिसांना दिली होती.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पथकाने संशयितांचा तंत्र विश्लेषण शाखेच्या मदतीने माग काढत येवला येथे अटक केली. एम एच.४४ बी ११३१ कार जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, अशोक साखरे, सत्यवान पवार, सागर कुलकर्णी, विलास चारोसकर, यांच्या पथकाने ही कारवाई केली.
भाजी विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या भालेराव टोळीला पोलिसांनी जेरबंद केले.