रस्त्यात प्रसूती झालेल्या ‘त्या’ महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; बाळाचाही स्वॅब घेतला !

नाशिक (विशेष प्रतिनिधी): सिडको परिसरात गुरुवारी (३ सप्टेंबर) रस्त्यावरच प्रसुती झालेली महिला कोरोना बाधित असल्याची बाब समोर आली आहे. या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज (४ सप्टेंबर) पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या महिलेला व तिच्या बाळाला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर, बाळाचाही स्वॅब घेण्यात आला आहे.

श्री स्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी, सिडको येथे येत असताना रस्त्यातच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना गुरुवारी घडली. सुदैवाने ही महिला आणि तिचे बाळ सुखरुप आहे. मात्र, या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

ती महिलाच दवाखान्यातून निघून गेली:
रुग्णालयाच्या डॉ. शितल मोगल यांनी सांगितले की, संगिता संजय लोंढे (वय २६) ही महिला तीन महिन्यांनी तपासणीसाठी रुग्णालयात आली. तिची तपासणी केली असता कुठल्याही क्षणी तिची प्रसुती होण्याची चिन्हे होती. तसेच यापूर्वी तिची तीन बाळंतपणे झाली होती. ही चौथी प्रसुती असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तिला रुग्णालयातच थांबण्यास सांगितले. मात्र, तिन्ही मुले घरी आहेत, असे सांगत ती महिला घरी गेली आणि रुग्णालयात परत येत असतानाच तिची रस्त्यातच प्रसुती झाली. केवळ दैव बलवत्तर आणि स्थानिक नगरसेवक व महिलांच्या सहकार्याने ही महिला सुखरुप आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भेट:
रस्त्यातच महिलेची प्रसुती झाल्याचे वृत्त बघून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. छाया साळुंखे, डॉ. शितल मोगल यांच्याशी संवाद साधला. रुग्णालयाने कुठलीही हलगर्जी केली नाही. मात्र, ती महिला काहीही न सांगता आणि डॉक्टरांनी दिलेला सल्ला न पाळता घरी गेली. त्यामुळेच तिची रस्त्यातच प्रसुती झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या शिष्टमंडळात पश्चिम विधानसभा अध्यक्ष पुष्पलता राठोड, सिडको विभागीय अध्यक्ष सुवर्णा कोठावदे, शहर पदाधिकारी सुजाता कोल्हे, लता चौधरी, गायत्री बोरसे, अश्विनी अमृतकर आदी महिलांचा समावेश होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790