नाशिक (प्रतिनिधी): देवळाली गाव येथे म्हसोबा यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मार्गावर वाहतूककोंडी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण विभागाने तीन दिवसांकरिता वाहतूक मार्गात बदल केला आहे. देवळाली गाव येथे सालाबादप्रमाणे म्हसोबा यात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. गुरुवारपासून (दि. ६) शनिवारपर्यंत (दि. ८) हा यात्रोत्सव चालणार आहे. हे मंदिर देवळाली गावाजवळ रस्त्यावर आहे. हाच रस्ता पुढे थेट देवळाली कॅम्प व भगूर गावापर्यंत जातो.
या मार्गावर नियमितची रहदारी व यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी व त्यांची वाहने मोठ्या प्रमाणात येणार असल्याने वाहतूककोंडीची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना जारी करत गुरुवारपासून दररोज दुपारी ४ ते सायंकाळी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून, वाहनचालकांनी या अधिसूचनेचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग असा:
बिटकोकडून जाणारी वाहतुक नाशिकरोड न्यायालयासमोरून अनुराधा चौकातून पुढे आर्टीलरी चौक, रोकडोबावाडी, हांडोरे चौक, विहितगाव सिग्नलवरून पुढे देवळाली कॅम्प व वडनेर-पाथर्डी रस्त्याने इतरत्र मार्गस्थ होईल.
एकेरी मार्ग असा:
सत्कार पॉइंट ते राजवाडापर्यंतचा रस्ता गुरुवारी (दि. ६) सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत एकेरी (वन-वे) वाहतुकीसाठी वापरता येणार आहे. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करत येथून मार्गस्थ व्हावे, अशी सूचना पोलिसांनी केली आहे.
या मार्गावर प्रवेश बंद:
बिटको चौकाकडून पुढे देवळाली कॅम्पकडे जाणारा रस्ता. देवळाली कॅम्पकडून विहितगावमार्गे बिटको पॉइंटकडे येणारा रस्ता निश्चित केलेल्या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
![]()


