नाशिक (प्रतिनिधी): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज (दि. २३ ऑगस्ट) नाशिक दौर्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत तपोवनातील मैदानावर महिला सशक्तीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी येणार असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काही मार्गांवरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त (मुख्यालय) चंद्रकांत खांडवी यांनी दिली.
वाहतुकीस प्रवेश बंद मार्ग: लक्ष्मीनारायण मंदिर ते जनार्दन स्वामी आश्रम या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद राहील, तसेच मिरची हॉटेल सिग्नल ते गोदावरी लॉन्स या मार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद राहील.
वाहतुकीस पर्यायी मार्ग: वाहने मारुती वेफर्समार्गे काठे गल्लीकडून नाशिकरोड व शहरात जातील. सिद्धिविनायक चौक मार्गे छत्रपती संभाजीनगर रोडने नांदूर नाका, पुढे बिटको, नाशिकरोडकडे जातील.
एस. टी. बस पार्किंगची ठिकाणे: येवला, नांदगाव, मालेगाव, निफाड, देवळा, सटाणा, चांदवड, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, पेठकडून येणार्या एस. टी. बसेसकरिता निलगिरी बाग मैदान येथे व्यवस्था करण्यात आली आहे, तर नाशिक तालुक्याकडून येणार्या एस. टी. बसेसकरिता जेजुरकर मंगल कार्यालयासमोर व्यवस्था ठेवली आहे, तसेच सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीकडून येणार्या एस. टी. बसेसकरिता मारुती वेफर्सच्या पुढे व्यवस्था केलेली आहे.
वरील निर्बंध दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत अमलात राहतील, तसेच वरील मार्गांमध्ये व वेळेमध्ये परिस्थितीनुसार ऐन वेळी बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सकाळी 9 वाजेपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत अवजड वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा; मात्र वरील प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने यांना लागू राहणार नाहीत.