नाशिक। दि. १३ जानेवारी २०२६: शरणपूर सिग्नलपासून ‘रामायण’ बंगल्यामार्गे त्र्यंबकरोडकडे जाणारा वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला रस्ता बारा महिने दोन टप्प्यांत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. महापालिकेच्या वतीने या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले जाणार असून, याबाबत शहर वाहतूक शाखेने अधिसूचना काढली आहे.
टिळकवाडी-तरण तलाव रस्ता शहराच्या मध्यवर्ती भागातील वर्दळीचा महत्त्वाचा रस्ता आहे. शहरामधून त्र्यंबकेश्वर रस्त्याला जोडणाऱ्या या उपरस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. हे काम महापालिका दोन टप्प्यात पूर्ण करणार असून, पहिला टप्पा टिळकवाडी सिग्नल ते सिटी प्राइडपर्यंत आणि दुसरा टप्पा तेथून पुढे तरण तलाव सिग्नलपर्यंत असा असणार आहे.
हे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गे वळविणे आवश्यक असल्याने मंगळवारपासून (दि. १३) अधिसूचनेनुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अधिसूचनेची मुदत १२ जानेवारी २०२७ पर्यंत असणार आहे. शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस उपायुक्त संदीप मिटके यांच्या सही, शिक्क्यानिशी अधिसूचना सोमवारी (दि. १२) जारी करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग असा:
टिळकवाडीकडून तरणतलावाकडे जाणारी वाहने कुलकर्णी गार्डनमार्गे पुढे होलाराम कॉलनी मायको सर्कलच्या दिशेने मार्गस्थ होतील. तरणतलावाकडून येणारी वाहतूक सिटी प्राइड चौकाजवळच्या टी-पॉइंट चौकातून डावीकडे वळण घेत होलाराम कॉलनीतून पुढे जाईल. दुसऱ्या टप्प्यात कामाला सुरुवात झाल्यानंतर टिळकवाडीकडून तरण तलावाकडे जाणारी वाहतूक सिटी प्राइड टी-पॉइंटवरून उजवीकडे वळण घेत होलाराम कॉलनीमार्गे पुढे रवाना होईल.
⚡ या अटी-शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे:
👉 वाहतूक नियोजनाकरिता योग्यरीत्या बॅरिकेडिंग करणे.
👉 रात्रीच्या वेळी बॅरेकेडिंग दिसतील असे रेडियम, रिफ्लेक्टर लावणे.
👉 रात्रीसुद्धा वाचता येतील असे विविध प्रकारचे परवानगीमध्ये नमूद असलेले सूचनाफलक लावावेत.
👉 रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिवसा व रात्रीसुद्धा दहा ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करावेत.
👉 वाहतुक वळविताना रस्त्याच्या मध्ये प्लॅस्टिक कोन, प्लॅस्टिक बॅरिकेडचा, दुभाजकाचा वापर करावा आदी.
![]()

