नाशिक: अट्टल चेनस्नॅचरला अटक, २२ गुन्हे उघड- तेरा तोळे सोने हस्तगत !

नाशिक। दि. १३ जानेवारी २०२५: शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या वाढलेल्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखांना अट्टल चोराला हुडकून काढण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट-१ व युनिट-२च्या पथकांनी कसोशीने तपास करत कल्याणमध्ये दोन दिवस सापळा रचून अट्टल सोनसाखळी चोर सादिक अली ऊर्फ जाफरी युसूफ सय्यद (रा. आंबेवली, कल्याण) यास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून १३ तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

सोनसाखळी चोरीच्या घटना एकापाठोपाठ वेगवेगळ्या भागांत घडत होत्या. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या घटनांमध्ये वाढ झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ व युनिट-२च्या पथकाने तपास करण्यास सुरुवात केली.

विविध घटनास्थळी भेट देत तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत चोराची ओळख पटवून तपासाला गती दिली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असलेल्या अमनेगावात राहणारा जाफरी हा इसम सोनसाखळी चोरी करून शहरातून पसार होत असल्याचे निष्पन्न झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

गुन्हे शाखा युनिट-१चे हवालदार नाझीमखान पठाण, मुख्तार शेख आणि युनिट-२चे उपनिरीक्षक शंकर काळे, सुनील आहेर यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना याबाबत कळविले. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी पथकाला कल्याण येथे रवाना केले. तेथे साध्या वेशात दोन दिवस दोन रात्र मुक्काम करून जाफरीचा शोध घेण्यात आला. सापळा रचून त्यास बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

जाफरी हा अट्टल सोनसाखळी चोर असून, त्याने यापूर्वी विविध गुन्हे केले आहेत. तो मागील नऊ वर्षे मुंबईच्या कारागृहात होता. मागील वर्षी तो कारागृहातून जामिनावर सुटून बाहेर आला होता. तेव्हापासून मोपेड गाडीचा वापर करत तो नाशिकमध्ये येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून जात होता. त्याने वर्षभरात शहर व परिसरात एकूण २२ सोनसाखळी चोरीचे व वाहनचोरीचेही दोन गुन्हे उघड झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790