नाशिक(प्रतिनिधी): शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता, बाजारपेठेत येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालावी, तसेच ठिकठिकाणी वाहनतळ निर्माण करावेत, अशी मागणी नाशिक़ रिटेल क्लॉथ मर्चेंट असोसीएशन संघटनेचे अध्यक्ष नरेश पारख यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने शहरात अनलॉक करण्यात आले आहे, त्यामुळे बाजारपेठेतील बहुतेक सर्वच आस्थापना उघडल्या आहेत, शहराची मुख्य बाजातपेठ असलेल्या रविवार कारंजा,मेनरोड, महात्मा गांधी मार्ग, चांदवडकर लेन, शिवाजी रोड या परिसरात ग्राहक खरेदी साठी दुचाकी, चारचाकी वाहनाने येतात, त्यातच या परीसरात स्मार्ट सिटी ची कामे ही सुरू आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होते आहे, दुकानांमधून ग्राहक कमी असले तरी रस्त्यावर खूपच गर्दी होते.
यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस, पालिका प्रशासन यांनी मुख्य बाजारपेठेत दुचाकी, चारचाकी वाहनांना येण्यास बंदी घालावी, त्यामुळे वाहतूक कोंडी चा प्रश्न मार्गी लागेल, व ग्राहकांना ही मोकळे पणाने बाजारात फिरता येईल, तसेच करोनाचे नियम ही पाळले जातील, त्याचवेळी महाकवी कालिदास कलामंदिर, स्टेडियम कॉम्प्लेक्स, गाडगे महाराज पुलाखाली पार्किंग ची व्यवस्था करावी, म्हणजे मुख्य बाजारपेठेत वाहने न आल्याने वाहतूक कोंडी होणार नाही,आपल्या या मागणीचा पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी गांभीर्याने विचार करावा, व्यापारी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आहेत, पुढेही करतील, असेही पारख यांनी म्हटले आहे.