नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिरापासून रविवारी (दि. ६) दुपारी तीन वाजता श्री रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत २० ते २५ हजार भाविक हजर राहतात. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दुपारपासून वाहतूक मार्गात बदल असेल. सत्कार पॉईंट ते बिटको सिग्नलकडे जाणाऱ्या लेन वरील वाहतुकीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.
दत्त मंदिर सिग्नल येथून बिटको चौकमार्गे रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशनकडून सत्कार पॉईंटकडे जाता येणार नाही. त्याऐवजी उपनगरकडून नाशिकरोड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या एसटी/सिटी लिंक बसेस दत्त मंदिर सिग्नल येथून उजवीकडे वळून सुराणा हॉस्पिटल आनंदनगरी टी पॉईंट, सत्कार पॉईंट रिपोर्ट कॉर्नर येथून रेल्वे स्टेशनकडे जातील व परत सुभाष रोडमार्गे- दत्तमंदिर सिग्नल व पुढे इतरत्र जातील. पुणेकडून नाशिककडे येणारी व पुणेकडे जाणारी सर्व जड अवजड वाहने व एसटी बसेस दत्त मंदिर सिग्नल येथून वीर सावरकर उड्डाणपुलावरून सिन्नर फाटाकडे जातील. सिन्नर फाटा येथून नाशिकरोड रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहने सावरकर उड्डाणपुलावरून दत्त मंदिर सिग्नल येथून डावीकडे वळून सुराणा हॉस्पिटल मार्गाने बाहेर पडतील.