नाशिक (प्रतिनिधी): शहराच्या हवामानात रविवारपासून (दि. ३०) अचानकपणे बदल झाला असून, अवकाळी पावसाचे ढग दिवसभर अधूनमधून दाटून येत होते; मात्र तरीदेखील उन्हाची तीव्रता नाशिककरांना जाणवली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन भिडले. सोमवारपासून (दि. ३१) पुढील तीन दिवस नाशिक जिल्ह्यासह घाटमाथ्याच्या परिसरात गडगडाटी पावसासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
ढगाळ हवामानाने शहरातील वातावरणात उष्मा वाढवला आहे. ३९.२ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद या हंगामातील आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. सोमवारी नाशिकमध्ये गडगडाटी स्वरूपाच्या मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग हा अत्यंत मंदावलेला आहे.
गेल्यावर्षी २४ मार्च रोजी उच्चांकी नोंद:
मागील वर्षी २४ मार्च रोजी शहरात कमाल तापमान ३९.२ अंश इतके नोंदविले गेले होते. यावर्षी मात्र सहा दिवस उशिराने रविवारी ३९.२ अंशांपर्यंत कमाल तापमान पोहोचले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाच्या तीव्रतेचे प्रमाण काही अंशी अद्याप तरी कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसते.
बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे, नैऋत्येकडून ईशान्येकडे दिशा घेणारे तसेच उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे झेपावणारे वारे आणि ईशान्येकडून येणारे विरुद्ध वारे यांच्या संगमातून समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत महाराष्ट्र-ओडिशा या राज्यांदरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे राज्यात येत्या ७ तारखेपर्यंत ढगाळ व गडगडाटी पावसाचे वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी तुरळक गारपिटीचीही शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी वर्तविली.
![]()


