नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
श्रीनिवास जोशी, आनंद भाटे यांचे गायन
नाशिक (प्रतिनिधी): भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी कलाश्री गुरुकुलच्या वतीने शनिवारी (दि. १०) आणि रविवारी (दि. ११) संध्याकाळी सहाला गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात ‘स्वराधिराज संगीत’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमात पं. आनंद भाटे यांचे शिष्य गायक डॉ. आशिष रानडे व पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी गायन करणार आहेत. शास्त्रीय गायनाबरोबरच अभंग देखील सादर केले जाणार आहेत.
रविवारी (दि. ११) पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी आपली कला सादर करणार आहेत, कर्नाटक सरकारतर्फे दिला जाणारा युवा प्रशस्ती राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार मिळविणारे विराज हे सर्वात कमी वयाचे मानकरी ठरले आहेत.
कलाश्री युवा साधक पुरस्कार:
यंदाच्या वर्षापासून कलाश्री युवा साधक पुरस्कार दिला जाणार असून तो विराज जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पं. आनंद भाटे यांचेदेखील गायन होणार आहे. रसिकांनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कलाश्रीतर्फे करण्यात आले आहे.